मराठी भाषेची ताकद

मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' आणि 'प'  पासून सुरु करुन येवढा मोठा
परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?

------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- ---------
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये '
कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर
कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या
कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- ---------

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या
पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या
पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात
पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या
पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा
पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी
पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर
पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी
पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी
पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा
पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा
पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत
पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच
पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे
प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला
पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या
पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला
पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच
पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.

------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ --------- ---------
ज्याने हे लिहिलं तो खरंच थोर !!

2 comments:

शंतनु said...

नमस्कार परेश म्हात्रे,

आपल्या 'मराठी खजाना (http://marathi-khajana.blogspot.com/2010/03/blog-post_7069.html)' या ब्लॉगला भेट दिली असता असे आढळून आले आहे की आपण माझ्या ब्लॉगवरील 'कोल्हेकुई', 'पोपटपंची - १' आणि 'पोपटपंची - २' हे लेख 'मराठी भाषेची ताकद पहा' अश्या शीर्षकाखाली जसेच्या तसे कॉपी करून प्रसिद्ध केले आहेत.

माझ्या ब्लॉगवरील कोणतेही साहित्य पुन:प्रसिद्ध करावयाचे असल्यास आपल्याला तशी लेखी पूर्व-परवानगी माझ्याकडून घ्यावी लागेल. माझ्या माहितीप्रमाणे मी आपल्याला माझे साहित्य पुन:प्रसिद्ध करण्याबाबत कधीही पूर्वपरवानगी दिलेली नाही.

माझा स्वत:चा ब्लॉग असताना व त्याची वाचकसंख्या समाधानकारक असताना मला माझे साहित्य इतरत्र प्रसिद्ध करण्याची गरज नाही. किबहुना आपण कॉपी केलेल्या लेखातील एक लेख मी स्वत: ब्लॉग लिहिण्यापूर्वी 'Young Expressions' मध्ये छापून आणलेला आहे व त्याचे सर्व अधिकार माझ्याकडे आहेत. तरीदेखील स्वयंप्रेरणेने माझ्या ब्लॉगवरील लेख स्वत:च्या ब्लॉगवर प्रसिद्ध केल्यानंतर त्या लेखाखाली माझे नाव व मूळ ब्लॉगची लिंक प्रसिद्ध करावयास हवी होती अशी किमान अपेक्षा एक ब्लॉगर म्हणून बाळगण्याचा मला शंभर टक्के अधिकार आहे.

आपण स्वत: त्या लेखाचे लेखक नसल्याचा अपरोक्ष उल्लेख जरी आपण केला असला तरी इतर व्यक्तीचे साहित्य प्रसिद्ध करण्यापूर्वी आपण परवानगी घेणे अथवा लेखकाची माहिती काढून त्याचे नाव लिहिणे आवश्यक होते. वरील दोन्ही गोष्टींचे पालन एक ब्लॉगर म्हणून आपण करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वत:च्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेल्या माझ्या लेखाखाली लेखक म्हणून माझे नाव द्यावे व जर नाव देण्याचे कष्ट घ्यायचे नसतील, तर तो लेख आपल्या ब्लॉगवरून ताबडतोब काढून टाकावा.

आपण मूळ स्त्रोत म्हणून संबंधित लेखाखाली माझे नाव या पत्राआधी दिलेले नाही, याचा पुरावा माझ्याकडे जतन करून ठेवलेला आहे.

धन्यवाद.
शंतनु भट

http://shantanubhat.blogspot.com/2009/02/blog-post.html

रोहित दिलीप होळकर said...

"ज्याने हे लिहिलं तो खरंच थोर !!" --- मुळ लेखकाने वर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या शब्दांना जागून आपण मूळ लेख संपादित करून शंतनुजींचे नाव आणि मूळ लेखाचा दुवा आपल्या लेखामध्ये डकवला तर उत्तम होईल!

Post a Comment